श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचे खरे नाव गोपाळराव काशीराव गायकवाड होते. त्यांचा जन्म १० मार्च १८८६३ रोजी कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा येथे झाला.
श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ साला दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या.
सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली.भारतामध्ये सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये अनेक ग्रंथालये स्थापन केली.
हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.
‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे.
श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले.