रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचा जन्म १३ मार्च १९२६ रोजी कोकणातील उफळे गावी झाला.सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीवर नोकरीस होते. सातत्याने “ललितगद्य’ हा वाङ्मयप्रकार हाताळणार्यात आणि आपल्या परीने त्यात भरही घालणार्या लेखकांत रवींद्र पिंगे हे नाव ठळक होते. रवींद्र पिंगे एक कृतार्थ लेखक, माणूस होते.
रवींद्र पिंगे दुर्बिण, कॅमेरा, टिपण वही आणि जागृत नजर घेऊन भारताच्या या टोकापासून त्या तटापर्यंत आपल्या लिखाणा साठी हिंडले. आसाम, अरुणाचल, अंदमान पाहून ते कच्छच्या चिखल-वाळूच्या रणात गेले/. नर्मदेच्या तीरावर भटकले. दक्षिणेतला श्रुंगेरीचा सुळका सर करून ते तुंगभद्रेच्या किनार्याणवरल्या श्रीशंकराचार्यांच्या मठापर्यंत पोहोचले. कृष्णेच्या डोहाकाठचं कविवर्य मर्ढेकरांचं चिमुकलं खेडं त्यांनी पाहिलं तसंच अयोध्येला जाऊन त्यांनी बंदीवान श्रीरामाला दंडवत प्रणिपात केला.
“शकुनाचं पान’ या त्यांच्या संग्रहात प्रवासवर्णनपर लेख (नर्मदेच्या उगमापाशी, मुक्काम झांशी, गणपती पुळे इ.) स्थलवर्णनपर (सानेगुरुजींचा जन्मगाव, हृदयाची हाक घालणारी ठिकाणं, अबूच्या पहाडावरील सूर्यास्त इ.), आत्मपरलेखन (माझी भूमिका, निवृत्तीतलं भाग्य, आकाशवाणीवरले उमेदवारीचे दिवस इ.) असे विविध प्रकारचे ३० लेख होते. यातील अनेक लेख वेगवेगळ्या दैनिकांसाठी, नियतकालिकांसाठी लिहिलेले असल्यामुळे छोटेखानी आहेत.
योगी अरविंदांचा येतो तसा श्रीगोद्याच्या शेख महंमद या सूफी संतकवीचाही येतो. प्रवास करताना पिंगे यांची रसिक, जिज्ञासू वृत्ती जे टिपते ते शब्दांत उतरविण्याचे कसब “मुक्काम झांशी’, “मधुर सुखाचा नजराणा’ यांसारख्या लेखांतून नजरेत भरते. “लेखकांच्या दुनियेतला गारठा आणि ऊब’, “संधिप्रकाशातलं समाधान’, “लेखक-कलावंतांचं जग’ आणि भाषणबाजीचं भन्नाट वारं’ यांसारख्या लेखांतून साहित्यजगातल्या विसंगतीचं, विरूपतेचं दर्शन ते घडवतात.
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. निवडक पिंगे या पुस्तकात मा.रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या ३०० व्यक्तिरेखांपैकी निवडक २६ व्यक्तिरेखांचा समावेश आहे.
रवींद्र पिंगे यांना आपल्या जीवनात वेळोवेळी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, मर्ढेकर, चि. त्र्यं. खानोलकर, वसंत बापट, इंदिरा संत अशा अनेक श्रेष्ठ साहित्यिकांचा तसेच पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंत देव, सुधीर फडके या गानतपस्वी मंडळींचादेखील दीर्घ सहवास लाभला.
रवींद्र पिंगे यांचे निधन १७ ऑक्टोबर २००८ रोजी झाले.