“कला” व व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात अनोखा ठसा, त्यात ही वेगळेपण करुन ते टिकवणारी फारच कमी मंडळी आपल्याला पहायला मिळतात, आणि त्यांचं वेगळेपण चिरंतन रहात त्यांच्यातील उत्साह आणि अथक परिश्रमाच्या जोरावर, असंच “सदा उल्हासित व्यक्तिमत्व स्वाती खंडकर” च्या रुपानं पहायला मिळत होतं.
मुळच्या मुंबईच्या असणार्या स्वाती खंडकर यांचा जन्म २२ मे १९४८ सालचा, त्यांचे वडिल कस्टम विभागात कार्यरत असल्यामुळे फिरतीची नोकरी असायची; स्वाती खंडकर यांचं शालेय माध्यमिक शिक्षण मुंबईच्या गिरगांव भागात पूर्ण झालं, पुढे वडिलांची बदली गोव्यात झाली, तिथे पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातून बी.ए.चं शिक्षण पूर्ण केलं, तसंच एम.ए. ला मानसशास्त्र विषया शिवाय “वर्तणूक शास्त्र” तसंच पत्रकारिता या विषयांच्या पदविका अभ्यासक्रम सुद्धा स्वाती खंडकर यांनी पूर्ण केलेला होता.
भाषा, लेखन, लोकांशी सतत निरनिराळ्या विषयांवर संवाद साधून आपल्याकडील ज्ञानात भर टाकणं ही हातोटी स्वाती खंडकरांना अचूक जमायची. मराठीच नाही तर हिंदी भाषेवर सुद्धा विलक्षण प्रभुत्व होतं.
स्वाती खंडकर यांनी एह.आर.डी. अर्थात (ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट) हा व्यवसाय पत्करला. त्यांच्या व्यवसायात आत्मिक विकास, कल्पना शक्तीचा विकास, ग्राहक हित, सुदृढकुटुंब जीवन, सदविचार आणि त्यांच नियोजन, महिला कामगार कर्मवार्यांचा विकास, संवादशैली, संभाषण कौशल्य, मानसिक तणाव कारण मिमांसा व त्याचं नियोजन अशा विषयांवर स्वाती खंडकर यांनी देशभरात अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, कॉर्पोरेट क्षेत्रात वावर असला तरीपण त्यांचं रहाणीमान अगदी साधं, व समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तींमध्ये त्या सहज मिसळत.
कलेवर त्यांचं विशेष प्रेम होतं, कित्येक वर्ष वनिता मंडळ कार्यक्रमात त्यांनी निवेदिका म्हणून काम हीम केलं, तसंच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. कोणत्याही विषयावर त्यांना बोलायला सांगितलं तरी अगदी सहजपण ओघवतं बोलून श्रोत्यांची आणि प्रेक्षकांची त्यांनी मनं जिंकली आहेत. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत नामांकित महाविद्यालयामधून मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक वृत्तपत्र, मासिकं, साप्ताहिकं, दिवाळी अंकांमधून ही स्वाती खंडकर यांनी स्त्री विषयक लेखन केलेलं आहे.
सामाजिक, शैक्षणिक साहित्य, माध्यम व व्यवस्थापन क्षेत्राशी जोडले गेल्यामुळे त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या त्यांनी कार्यवाह म्हणून काम पाहिलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वाती खंडकर हसत मुखाने वावरत होत्या. स्वादुपिंडाचा कर्करोग असूनही त्यांनी इतरांना जाणवू दिलं नाही. ४ जून २००९ या दिवशी स्वाती खंडकर यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या अकाली निधनानंतर कला तसच व्यवस्थापकीय क्षेत्राचं नुकसान झालं असून, समाजातील उत्तम मार्गदर्शिका गमावल्याचं दु:ख ही आहे.
(लेखक – सागर मालाडकर)