फेसबुक लाइक्स आणि कॉमेंट्सचं वास्तव

फेसबुक हे आता अनेकांच्या जीवनाचं अविभाज्य अंग झाले आहे. काहीजण फेसबुकच्या इतके  आहारी गेले आहेत की फेसबूक हे आता त्यांचं व्यसन झाले आहे. . काहीजण २४ तासापैकी १८ तास फेसबुक वरच पडलेले दिसतात. वेगवेगळ्या लेखकांच्या वेगवेगळ्या पोस्टवर त्यांच्याकडून धडाधड लाईक आणि कमेंटसचा मारा सुरु असतो.. एखादी पोस्ट पब्लिश व्हायचा अवकाश की त्यावर अक्षरशः मिनिटभरात लाइकस यायला सुरुवात होते… मग प्रश्न पडतो की लाईक करणार्‍याने ती पोस्ट खरोखर वाचलेय की नाही?

अर्थात अशा प्रकारच्या  लाईक आणि कमेंटने पोस्ट लिहिणारा सुखावून जातो. शंभर-सव्वाशे लाइक्स आल्यावर त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. तीनशे-चारशेच्या वर लाईक्स आणि कॉमेंटस गेल्यावर त्याला स्वर्गात पोहोचल्याचा भास होतो… सतत पंधरा-वीस पोस्टवर अशाच प्रकारच्या लाईक कमेंट झाल्यावर तो सोशल मीडियाचा किंग झालाय अशी त्याची भावना होते.

फेसबुक पोस्ट वर किती लाईक आले किंवा किती कॉमेंट आल्या यावर लेखकाची लोकप्रियता ठरवण्याचा एक वेगळाच पायंडा सध्या पडत आहे.

खरंच आपण फेसबुकवर आपलं अस्तित्व पणाला लावणं आवश्यक आहे का? फेसबुकवरची आपली  एखादी पोस्ट  किती जण खरोखर वाचतात.. किती त्याला  लाईक करतात  आणि किती जण त्यावर कॉमेंट करतात? हा खरंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे पण तो तेवढाच दुर्लक्षिला गेलेला आहे.

बर्‍याच लोकप्रिय लेखकांच्या मी बघितलेल्या अनेक चांगल्याचुंगल्या फेसबुक पोस्टना सर्वसाधारणपणे ५०० च्या आसपास लाईक्स आणि जास्तीतजास्त २५० ते ३०० कॉमेंटस आलेल्या दिसल्या.

अर्थात हे लाईक्सचं गणित सुद्धा फसवं आहे बरं का….  अनेकदा लेखन काय आहे हे न बघता लेखकाचं नाव बघून लाइक दिली जाते.  मला इथे कोणाचा अपमान करायचा नाही.  पण  वस्तुस्थिती अशी आहे  की `तू माझ्या पोस्टला लाईक कर मी तुझ्या पोस्टला लाईक करतो’ अशी देवघेव फेसबुकवर मोठ्या प्रमाणात चालते.

माझ्या माहितीतला एक तथाकथित सामाजिक-कम-राजकीय विचारवंत  दररोज सकाळी उठल्या उठल्या स्वतःच्या वॉलवर आणि इतर अनेक ग्रुपवर फुसकुल्या टाकल्याप्रमाणे  एखादा राजकीय प्रश्न टाकतो. अगदी एका ओळीचा..  आणि वाचकांकडून त्याचे उत्तर मागतो. संध्याकाळपर्यंत पाच-सहाशे लाईक्स आणि दोनशे-अडीचशे उत्तरं येऊन जातात.  त्यातले २५% नमस्कार, पुष्पगुच्छ, २५% खरोखर त्या प्रश्नाला उत्तरं आणि उरलेले ५०% दुसऱ्याच्या उत्तरावर  कॉमेंटस! संध्याकाळी हे महाशय पुन्हा आपल्या पोस्टवर येतात आणि `सर्वांना धन्यवाद’ एवढंच  लिहून पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी गायब होतात…

सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या `भक्त’ आणि `रुग्ण’  मंडळींच्या टोळ्या फेसबुकच्या लाईकस आणि  कॉमेंट्सवरच जगतायत. फेसबुकच्या लाइक्स आणि कॉमेंट्स मधून आपल्या विचारांना विरोध करणार्‍यांना ट्रॉल करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढतेय.

`प्रत्यक्ष आयुष्यात विचारत नाही कुत्रं आणि फेसबुकवर पाच हजार मित्र’ अशी यांची परिस्थिती असते.

आपले मित्र यादीतले आणि कॉमेंट देणाऱ्यांमध्ये खरोखर आपले मित्र किती आहेत  हे शोधायचं असेल तर एक सोपा उपाय. काहीतरी अडचणीसाठी मदत मागणारी एखादी पोस्ट टाका.. आणि मग बघा किती जण लाईक करतात किंवा कॉमेंट देतात ते….

लाईक आणि कमेंट करणाऱ्या सुद्धा झुंडीच्या झुंडी फेसबुकवर कार्यरत आहेत ही वस्तुस्थिती आहे…  किंबहुना हे कटु सत्य आहे.

आणि याच  झुंडींमध्ये लपलेले असतात  फेसबुक वरचे साहित्यचोरही !

— निनाद प्रधान 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*